राग व्यक्त होताना त्यामागे अनेक अंतर्प्रवाह असतात. दबलेल्या भावना, असुरक्षिततेची भावना, पूर्वी घडलेल्या घटना, आपला नकारात्मक दृष्टिकोन इत्यादींमधून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा एकदम व्यक्त होत असते.
थोडक्यात, आत्ता प्रसंग घडला आणि केवळ त्याबद्दलची प्रतिक्रिया म्हणून विशिष्ट प्रमाणात रागावलो, असं प्रमाण नसतं. आपल्या एकूणच भावनात्मक जडणघडणीचा त्यात वाटा असतो. रागाच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची पायरी म्हणजे रागाचं मूळ शोधून काढणं. ते नाहीसं करण्याचा प्रयत्न करणं.
आपल्याला राग कशामुळे येतो, कुठल्या व्यक्तीचा येतो, कुठल्या प्रसंगात येतो, आपल्याला एखादी व्यक्ती का आवडत नाही किंवा तिच्या कुठल्या कृतीमुळे राग येतो, रागवण्यापूर्वी आपला मूड नेमका कसा असतो? आपण मुळातच सतत अस्वस्थ आहोत का, सहन न होऊ शकणारं दडपण आहे का- इत्यादी प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे.
थोडक्यात हे आपल्या मन:स्थितीचं किंवा भावावस्थेचं ऑडिट असणार आहे. राग ताब्यात ठेवायचा असेल, तर स्वतः किंवा तज्ज्ञांच्या साह्यानं हे करणं गरजेचं आहे. हे करायचं असेल, तर आधी आपण आतून स्वस्थ होणं आणि साक्षीभावाने, त्रयस्थपणे स्वतःकडे पाहणं शिकायला हवं. हे जमू शकेल का? होय. हे कुणालाही नक्की जमू शकेल.
रागाच्या व्यवस्थापनासाठी पुढील गोष्टी कराव्यात
रागाचं मूळ शोधून काढणं. ते नाहीसं करण्याचा प्रयत्न करणं
रोज चल पद्धतीचे व्यायाम ज्यामुळे मेंदूत serotonin, endorphins सारखी संप्रेरके स्रवतील. रिलॅक्सेशन थेरपीज शिकून घेणं
रोजच्या दिनक्रमात योग, दीर्घ श्वसनाची तंत्रं व विविध ध्यान पद्धती यांचा अंतर्भाव करणं. तज्ज्ञांकडून गायडेड इमेजरी तंत्रांद्वारे स्वस्थता
संगीताचा नित्य आस्वाद . माइंडफुलनेससारखी (वर्तमान क्षणात राहण्याची कला) तंत्रं शिकणं
रोज anger diary लिहिणे, ज्यात घडलेला प्रसंग त्यात आपल्या रागाची प्रतिक्रिया, समोरच्याची प्रतिक्रिया, आपल्याला जाणवलेली शारीरिक व भावनिक लक्षणे, असतील. आपण कसं react व्हायला हवं होतं आणि झालो हे असेल.
स्वतःशी असलेला संवाद सकारात्मक करणं. आपल्या रागावण्यात अहंकाराचा वाटा किती व तो योग्य आहे का ते तपासणं
प्रत्यक्ष राग येण्यापूर्वी वा वाढण्यापूर्वी, काही लांब श्वास घेणं, शांत राहण्यासंबंधी सकारात्मक स्वयंसूचना देणं, मनात १ ते १०० अंक उलट्या क्रमानं मोजणं, पाणी पिणं, शक्य असेल तर तिथून निघून जाणं. थोडक्यात त्यावेळी न रागावता शांत राहण्याची मेंदूला सवय लावणं. शांत झाल्यावर, काही काळानंतर शांत स्वरात; पण ठामपणे आपलं म्हणणं ज्या व्यक्तीचा राग आलाय तिला सांगणं (ऐकवणं नव्हे). बऱ्याचदा लक्षात येईल, की इतकं रागावण्याचं काही कारणच नव्हतं
विचार करण्याच्या पद्धतीत दोष असल्यास शक्य असल्यास स्वतः किंवा तज्ज्ञांद्वारे दूर करणं. गरज भासल्यास वेळेवर तज्ज्ञांची मदत घेणं. कारण कधीकधी मानसिक आजार किंवा व्यक्तिमत्त्वातील दोष (personality disorder) असू शकतात. ते वेळेवर लक्षात येणं आणि त्यावर उपचार होणं महत्त्वाचं ठरतं.
एक सत्य आपण लक्षात घेऊया. स्वतःबाहेरचं (external ) वातावरण आपण बदलू शकत नाही; पण स्वतःच्या आतलं (इंटर्नल) वातावरण आपण नक्की बदलू शकतो. आतून शांत, स्वस्थ आणि स्थिर होऊ शकतो.
Article published in www.esakal.com | 22 Jun. 2024