Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


ताणाची कारणं आणि उपाय

 

आयटी क्षेत्रात सध्या ताणतणाव आहेत हे आपण गेल्या भागात बघितलं. त्यांची कारणं आणि उपाय या गोष्टी आता आपण बघूयात.

ताणतणावांची कारणं

  • आयटी क्षेत्रातील व्यक्ती achievement oriented असतात. टार्गेट पूर्ण करणं, परदेशातील व्यक्तींशी वेळीअवेळी संपर्क ठेवावा लागणं, घरी आल्यावरही ऑफिस डोक्यात ठेवावं लागणं यामुळे कुटुंबीयांसाठी, सोशल लाइफसाठी पुरेसा वेळ देत येत नाही.

  • अतिव्यस्त रूटिनमुळे स्वत:ला रिलॅक्स करणं, मनोरंजन यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही.

  • प्रचंड स्पर्धा आणि जॉब संदर्भातील असुरक्षितता यामुळे सततचा ताण.

  • जेवणाच्या, झोपेच्या वेळा नीट न पाळता आल्यामुळे शरीरातील जैविक घड्याळ बिघडून जातं. त्याचा शरीरावर, मनावर विपरीत परिणाम होतो. हे अस्वास्थ्य कुटुंबीयांवर, नात्यांवर परिणाम करतं.

  • हळूहळू अस्वस्थतेचा आणि नैराश्याचा आजार पाय पसरायला लागतो. व्यसनं वाढीस लागतात.

  • पती-पत्नी एकमेकांना quality time देऊ शकत नाहीत. रोमान्स, सेक्स यांसाठी आवश्यक मानसिक स्वास्थ्य नाहीसं होतं.

या क्षेत्रातील बाह्य परिस्थिती अशीच राहणार किंवा दिवसेंदिवस अधिक बिकट होत जाणार. त्याला तोंड देण्यासाठी आपण आतून शांत, कणखर, स्वस्थ व्हायला हवं. कसं?

1) ‘बाह्य’ वातावरण कसंही असो, आपण ‘आतलं’ वातावरण बदलायला हवं. त्यासाठी काही गोष्टी शिकायला, बदलायला हव्यात. थोडक्यात मेंदूचं (मनाचं) reprogramming करायला हवं.

2) तणावनियोजनाच्या पद्धती शिकून घ्यायला हव्यात. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व, अनुवांशिक गुण, स्वभाव, मेंटल मेकअप वेगळा असल्यानं या पद्धतीही वेगळ्या असू शकतात.

3) आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवंय? पुरेसा पैसा हवाच, वैभवही हवं; पण फक्त पैसा की पैशाबरोबरच स्वास्थ्य, मन:शांती? पैशानं सुखसोयी मिळतील; पण आनंद ही मनाची अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागेल. एका मर्यादेनंतर भोगलालसा, चंगळवाद फक्त दुःख निर्माण करतात, हे लक्षात ठेवावं.

4) ताण समजून घेणं व त्यांची नोंद करणं महत्त्वाचं. सध्या कुठले ताण आहेत? कुठल्या गोष्टींची काळजी, भीती वाटते? कशामुळे राग येतो? तो ताब्यात राहतो का?... अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. थोडक्यात हे एक प्रकारचं भावनांचं ऑडिट असेल. तज्ज्ञांच्या साह्यानं त्यावरचे उपाय शोधावेत. तज्ज्ञांशी बोलल्यामुळे ताणाचा निचरा व्हायला मदत होईल.

5) स्वयंसूचना व creative visualization ची तंत्रं शिकून घ्यावीत. तज्ज्ञांकडून ‘स्विच ऑन, स्विच ऑफ’ची तंत्रं शिकून घ्यावीत, ज्यायोगे ऑफिस व वैयक्तिक आयुष्य यांत सीमारेषा आखता येईल. ऑफिसचे ताण वैयक्तिक आयुष्यापासून दूर ठेवता येतील.

6) आपल्या आयुष्यातली इतर माणसं, मित्र आणि विशेषकरून जोडीदार, त्यांच्याबरोबरची नाती महत्त्वाची आहेत हे समजून घ्यावं. जोडीदार नोकरी करत असेल, तर त्याच्या मन:स्थितीचा विचार करायला हवा, त्याचे ताण समजून घायला हवेत. रात्री कितीही उशीर झाला तरी मायेचा स्पर्श आणि जिव्हाळ्याचं बोलणं, मन मोकळं करणं हे नियमित करायला हवं.

7) व्यायाम, योगासनं, प्राणायाम ,  ध्यान व वर्तमान क्षणात राहण्याची  तंत्रं महत्त्वाची आहेत. रोज चल पद्धतीचा (Aerobics) व्यायाम म्हणजे वेगात चालणं, धावणं, पोहणं इत्यादी. यामुळे शरीरात serotonin, endorphins;  तसंच इतर नैसर्गिक anti depressants स्रवतील. तसंच प्राणायाम , ध्यानाच्या काही पद्धती, श्वासावर आधारित ध्यान, क्षणसाक्षीत्वाची  (mindfulness), वर्तमान क्षणात राहण्याची  तंत्रं शिकून घ्यावीत.

8) संगीत, कविता, छंद आणि मैत्र : संगीत हे मन:स्थिती सुधारण्यासाठी उत्तम औषध आहे. रोज संगीताची साधना, आवडतं संगीत रोज ऐकणं, कविता वाचणं, ऐकणं, आवडता छंद जोपासणं  याची खूप मदत होते. ज्याच्यापाशी मोकळे होऊ शकू असे जिव्हाळ्याचे; परंतु निर्व्यसनी मित्र जोडणं याचाही छान उपयोग होतो.

9) रोज इतर व्यायामाबरोबरच ध्यान करणं, सुट्टीच्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात जाणं, तिथली शांतता अनुभवणं, आत भरून घेणं यानंही मन स्वस्थ व्हायला मदत होते. कर्तृत्वाची शिखरं पादाक्रांत करताना ‘आतला मी’ आनंदी, स्वस्थ, कणखर राहणं खूप महत्त्वाचं. प्रयत्नांनी ते शक्य आहे.

 

Article published in www.esakal.com | 16 Mar. 2024