Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


पॅनिक ॲटॅक डिसॉर्डर

 

पॅनिक ॲटॅक डिसॉर्डरची प्रमुख कारणे

1) मेंदूतील न्युरोकेमिकल्सच्या असंतुलनामुळे.

2) अनुवांशिकता हाही भाग असू शकतो.

3) पूर्वायुष्यातील, विशेषत: लहान वयातील दुर्दैवी प्रसंग वा मृत्यूसारख्या घटना पाहिल्यामुळे मनात बसलेली भीती.

4) विचार करण्याची सदोष पद्धती हे कारण असू शकतं. लहानपणापासून शरीरातील किरकोळ आजार मोठा (magnify) मानण्याची मनाची सवय किंवा तशी भीती बाळगण्याची सवय.

5) अस्वस्थतेचा इतर आजार, नैराश्य किंवा इतर मानसिक आजाराबरोबरसुद्धा हा आजार असू शकतो.

6) जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू, घटस्फोटासारखी दुर्दैवी घटना, आर्थिक फटका किंवा इतर मानसिक आघातांमुळे हा आजार जडू शकतो.

7) लहानपणी वा नंतर अनुभवलेल्या लैंगिक अत्याचारामुळे झालेला मानसिक आघात, दाबून टाकलेल्या या संदर्भातील स्मृती ही कारणंही असू शकतात.

उपाययोजना

योग्य त्या औषधोपचाराबरोबरच सायकोथेरपीज अतिशय आवश्यक आणि उपयुक्त ठरतात. उदा. सीबीटी थेरपी, एक्स्पोझर थेरपी, रिलॅक्सेशन्स थेरपीज, माइंडफुलनेस बेस्ड थेरपीज, Systematic Desensitization Therapy (SDT) - पद्धतशीरपणे भीतीचं  निर्बलीकरण करणं, पायरी पायरीनं भीतीवर मात करणं. भीतीच्या निर्बलीकरणासाठी virtual reality व इमेजरीजचा (कल्पनाचित्रांचा) वापर इत्यादी उपयुक्त ठरतात.

मुख्य म्हणजे विचार करण्याची अयोग्य पद्धत आणि चुकीची प्रतिक्रिया देण्याची मनाची आणि त्यामुळे शरीराची सवय बदलण्याचा प्रयत्न महत्त्वाचा असतो. विचार करण्याची योग्य rational पद्धत रुजवणं, तसंच प्रत्यक्ष ॲटॅक येत असताना कसं वागायचं, realistic विचार कसा करायचा, कुठल्या स्टेप्स घ्यायच्या, श्वासाचा कसा वापर करायचा, मन पद्धतशीरपणे दुसरीकडे कसं वळवायचं, मृत्यूच्या भीतीतून मन divert कसं करायचं वगैरे गोष्टींच्या प्रशिक्षणाचा खूप उपयोग होतो.

ॲटॅक नसताना इतर वेळी पद्धतशीरपणे मनाला प्रशिक्षण द्यावं लागतं. जुन्या दबलेल्या भीती काढून टाकाव्या लागतात. स्वत:वर, स्वत:च्या नकारात्मक भावनांवर, irrational thinking वर ताबा मिळवण्याची तयारी व त्यासंदर्भातला आत्मविश्वास निर्माण करावा लागतो.

मुळात आपल्याला कुठलाही शारीरिक आजार नाहीय हे तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय आणि शारीरिक आजार नसताना, तो असल्यासारखी symptoms का जाणवतात, असं का होतं हे समजून घेणं आणि ते संपूर्ण बरं होऊ शकतं यावर विश्वास ठेवून त्यासाठी मनापासून पद्धतशीर प्रयत्न करणं (सेल्फ हेल्प) महत्त्वाचं आहे.

पॅनिक ॲटॅकची ती वीस-पंचवीस मिनिटं भीतीदायक, हतबल करून टाकणारी असतात; पण योग्य आणि वेळेवर उपाययोजना केल्यानं त्यातून मुक्तता होऊ शकते.

 

Article published in www.esakal.com | 10 Aug. 2024