Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


नकारात्मक विचारांचे पॅटर्न

 

नकारात्मक विचारांबाबतचे काही पैलू आपण गेल्या आठवड्यातील लेखात बघितले.

(Read previous article - विचार करण्याच्या अयोग्य पद्धती)

आता इतर गोष्टी बघू. काही Negative Thinking Styles किंवा patterns आपण बघूया.

१) घडणाऱ्या घटना, गोष्टी, वागणूक इत्यादी काळ्या-पांढऱ्या कॅटेगरीतच पाहणे : टोकाचा विचार करणे. काळ्या आणि पांढऱ्यामध्ये ग्रे किंवा राखाडी शेड असते हे मान्यच नसणे. उदा. मी एखादी गोष्ट जरी परफेक्ट केली नाही, तर त्याचा अर्थ मी पूर्णपणे अपयशी आहे असा विचार करणे.

२) अतिसामान्यीकरण (Overgeneralization) : आपल्या हातून एखादी चूक झाली, तरीसुद्धा ‘मी एकही काम नीट करू शकत नाही’ असा विचार करणे.

३) मेंटल फिल्टर : घडणाऱ्या सकारात्मक, अनुकूल घटनांकडे दुर्लक्ष करणे आणि एखाद्या नकारात्मक किंवा प्रतिकूल घटनेवरच लक्ष केंद्रित करणे.

४) सकारात्मकतेचा अभाव (Diminishing the positive) : कौतुकास्पद काम झालं आणि कोणी अभिनंदन केलं, तरी ‘ते अभिनंदन केवळ मला बरं वाटावं म्हणून केलेलं आहे. खरं तर काम काही इतकं चांगलं झालं नाही आहे,’ अशासारखा विचार करणं.

५) भावनिक कार्यकारणभाव (Emotional reasoning) : आपल्याला जसं वाटतंय तेच खरोखरचं वास्तव किंवा वस्तुस्थिती आहे असं मानून चालणं. उदा. ‘एकुणात मी अपयशीच आहे असं मला वाटतं. आता मला आतून तसं वाटतंय म्हणजे तसंच असलं पाहिजे.’

६) ‘Shoulds’ and ‘should-nots’ : स्वत:ला ‘च’च्या कुलपात अडकवून टाकणं. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडून विशिष्ट पद्धतीनं झालीच पाहिजे. झाली‘च’ पाहिजे हा अट्टाहास असतो. किंवा एखादी गोष्ट माझ्याकडून होता‘च’ कामा नये. तशी ती झाली‘च’ किंवा झाली‘च’ नाही, तर स्वत:वर विलक्षण चिडचिड होते. पर्यायानं मन:स्वास्थ्य बिघडतं. आजूबाजूच्या वातावरणावर आणि व्यक्तींवरही विपरीत परिणाम होतो.

७) लेबल लावणं : पूर्वी आलेल्या लहानशा अपयशामुळे आपण म्हणजे ‘मूर्तिमंत अपयश’ असं लेबल स्वत:ला लावून टाकायचं आणि या गैरसमजुतीच्या प्रभावाखाली सतत दडपणाखाली राहायचं. आपल्याकडून चांगलं काही होऊच शकणार नाही हे जणू ठरवूनच टाकायचं.

८) Personalising : काही विपरीत, प्रतिकूल घडलं किंवा काही चुकीचं घडलं तर दोष स्वत:कडे घेण्याची प्रवृत्ती. आपणच या चुकीला जबाबदार आहोत. आपण असे वागलो म्हणून हे असं प्रतिकूल घडलं असा विचार करण्याची सवय.

९) Magnification : आपल्या बाबतीत सगळं छान घडत असताना, घडलेलं असताना, त्याकडे दुर्लक्ष करून एखादी लहानशी कमतरता उगाळत बसणं. घडलेल्या पॉझिटिव्ह गोष्टींपेक्षा लहानशा निगेटिव्ह गोष्टीलाच महत्त्व देत बसणं. ती मोठी करून पाहाणं.

आपली विचार करण्याची पद्धत वरील प्रकारात मोडते का हे तपासायला हवं. या सगळ्या विचार करण्याच्या चुकीच्या पद्धती आपलं मन:स्वास्थ्य बिघडवून टाकतात. आपल्या प्रगतीच्या आड येतात. प्रत्येक विचार - मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक, आपल्या ब्रेन केमिस्ट्रीवर परिणाम करतो. सकारात्मक विचार ब्रेन केमिस्ट्रीमधे चांगले बदल घडवून आणतात आणि मन:स्थिती स्वस्थ, शांत; तरीही उत्साही बनत जाते. आपण कार्यप्रवृत्त होतो आणि मुख्य म्हणजे जीवनातला प्रत्येक क्षण रसरसून आनंदानं जगायला प्रवृत्त होतो.

 

Article published in www.esakal.com | 25 May. 2024