Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


तरुणाई आणि मनावरचा ताबा

 

काळीज हादरून जावं अशा दुर्दैवी घटना सध्या काही तरुणांकडून घडत आहेत. काही दिवसांपूर्वी वरच्या मजल्यावरून एका युवकानं आत्महत्या केली. एका मुलीच्या तोंडावर ॲसिड फेकण्यात आलं. पुण्यात रागाच्या भरात जन्मदात्या आईवडिलांचा निर्दयपणे खून करण्याचा प्रयत्न एका मुलानं केला. अशा घटना वारंवार घडत आहेत.

अशी लांच्छनास्पद कृत्यं हातून घडण्यामागे संशोधनानुसार, मुख्यत: पुढील कारणं असू शकतात. तीव्र स्वरूपाचा व्यक्तिमत्त्व दोषाचा आजार (personality disorders), धोकादायक, dangerously anti social child, वेळेवर उपचार न घेतलेला मानसिक आजार, घरातून मुलांवर झालेले मानसिक अत्याचार (child abuse), नकारात्मक भावनांवर नियंत्रण गमावलेला टोकाचा अस्वस्थतेचा आजार. ड्रग्जसारखी व्यसनं, पालकांकडून योग्य संस्कार नसणं, कृती करताना सद्सद्विवेक बुद्धी कटऑफ होणं, भान हरपणं.

या घटनांच्या निमित्तानं एकूणच तरुणाई भावनांवरचं नियंत्रण का गमावून बसतेय, त्यांच्यातील हिंसा, कामभावनेचं विकृत प्रकटीकरण, चंगळवाद या सगळ्याचाच विचार व्हायला हवा.

कारणमीमांसा

पौगंडावस्थेतील मुलांच्या मेंदूचा काही भाग, विशेषत: frontal cortex (जिथे निर्णयक्षमता, भावनांवर नियंत्रण, विवेक शक्ती वापरणं, इम्पल्सवर ताबा अशा अनेक गोष्टी घडत असतात), restructure होत असतो. नवीन नवीन synapses प्रचंड वेगात तयार होत असतात, त्यांच्यात बदल घडत असतात.

अशा अवस्थेमध्ये मन:स्वास्थ्य ठीक नसेल, मूल्यं ढासळली असतील, फँटसीत वावरायची सवय लागली असेल, तर मुलांकडून अयोग्य निर्णय घेतले जाऊ शकतात, चुकीचं वागलं जाऊ शकतं. या वयातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते; तसंच समोरच्याच्या भावना, कृती, चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन समजून घेण्यात मुलांची चूक होऊ शकते.

प्रौढांमध्ये मेंदूतील prefrontal cortex चा वापर भावनांचं मूल्यमापन करताना केला जातो, तर मुलांमध्ये त्यापेक्षा जास्त dependency, अमिग्डलावर असते आणि मग पटकन् भावनाधारित चुकीची प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकते. अर्थात हे चुकीच्या वागण्याचं समर्थन निश्चितच नव्हे; पण मुलांच्या वर्तनामागील कारणं समजून घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते.

धोक्याची लक्षणं

एक लक्षात घेऊया, violence म्हणजे फक्त हत्या, मारामारी नाही. यात धमकी देणं, मुलींची छेड काढणं, बलात्कारासारखं पाशवी कृत्य, दारूपासून ड्रग्जपर्यंत सगळी व्यसनं, जुगार इत्यादी सर्व आलं. लक्ष ठेवा, की मुलांमध्ये पुढील लक्षणं दिसतायत का?

  • इतरांना धमक्या देणं. इजा करू शकणारी लहान सहान हत्यारं विनाकारण बाळगणं. हत्यारांविषयी विलक्षण आकर्षण.

  • घरच्या किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याची प्रवृत्ती.

  • तंबाखू, दारू, ड्रग्ज इत्यादींचं व्यसन.

  • व्यसनी मित्र-मैत्रिणी.

  • पॉर्न फिल्म्स पाहणं.

  • सतत मूड स्विंग्ज.

  • लहान सहान गोष्टींवरून विनाकारण चिडचिड.

  • उलट उत्तरं देणं.

  • हिंसेचे विचार सतत बोलून दाखवणं.

  • मृत्यूविषयी बोलत राहणं.

  • शाळेत, सोसायटीत, घरी सतत मारामारी करणं.

  • पाळीव किंवा रस्त्यावरील प्राण्यांना त्रास देणं.

  • घरापासून लांब राहण्याची प्रवृत्ती. सातत्यानं मित्र-मैत्रिणींबरोबर नाइट आउटला जाणं.

  • जेवण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये  बदल.

  • हिंसा असणाऱ्या व्हिडिओ/ मोबाईल गेम्सचं व्यसन.

  • टीका अजिबात सहन न होणं व सतत दुखावलं  जाणं. लहान सहान गोष्टीवरून आक्रमक, अति हळवे होणं; लहान सहान गोष्टींवरून अश्रुपात/रडणं.

  • आपण कोणीतरी विशेष आहोत आणि इतरांनी आपल्या म्हणण्याप्रमाणंच वागलं पाहिजे असा पवित्रा.

  • मुली, स्त्रियांविषयी बीभत्स बोलणं.

  • एखादी मुलगी आपली मालमत्ता असल्यासारखं तिच्या संदर्भात बोलणं, वर्तन करणं.

  • शाळेत, क्लासेसमध्ये सातत्यानं अनुपस्थिती आणि निराशाजनक मार्क्स, सतत नापास होणं.(क्रमशः)

 

Article published in www.esakal.com | 22 Jun. 2024