सुजयच्या चेहऱ्यावर विश्वास दिसायला लागला होता. विमानानं धावपट्टी सोडली आणि तो बोलायला लागला, ‘प्रत्येक वेळेला विमानानं जायचं म्हटलं, की पोटात गोळा येतो. अस्वस्थता सुरू होते, प्रवासाचा दिवस उजाडला, की खचल्यासारखं होतं, विमानात बसलं की छातीत धडधडणं, डोकं जड होणं, आपलं काहीतरी बरं वाईट होणार असं सगळं सुरू. वाटतं आता बास झालं, आपली सहनशक्ती संपली, सोडून द्यावी ही नोकरी.’
(Read previous article - काल्पनिक भीती)
तो अगदी हतबल झाला होता. त्याला समुपदेशनाची गरज होती. कदाचित दीर्घ काल उपचारांचीही. कारण हा भयगंडाचा (फोबिया) प्रकार दिसत होता. काही गोष्टी मला कराव्या लागणार होत्या आणि काही त्याला स्वतःला. त्याला धीर दिला, की यातून नक्की बाहेर पडता येईल. विचारलं, ‘सुजय, संख्याशास्त्रानुसार विमानांचे अपघात सर्वांत कमी होतात की इतर वाहनांचे, म्हणजे रेल्वे, रस्त्यावरील वाहने वगैरेंचे?, विमानांचे. बरोबर आहे? बरं, मृत्यू टाळता येतो का? तू विमानानं नाही गेलास आणि मृत्यू येणार असेल तर टाळता येईल? आणि नसेलच येणार तर? विमानानं जायचंय ठरल्यावर जे काही छातीत धडधडतं, रक्तदाब वाढतो, मळमळल्यासारखं होतं याची कारणं निर्माण होणाऱ्या भितीत, मानसिक ताणात आहेत की शारीरिक? ’
तो थोडा विचारात पडला. पटत तर असावं; पण एवढ्यानं प्रश्न सुटणार नव्हता. भीतीचं मूळ खूप खोलवर रुजलं होतं, अन् ती अवास्तव, निराधार, निरर्थक होती. शेवटी फोबिया म्हणजे तरी काय? विशिष्ट प्रसंग, घटना, गोष्टी, कृती वगैरेंची अकारण वाटणारी, अशास्त्रीय, अवाजवी वाटणारी तीव्र भीती. अशी भीती दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते, तेव्हा व्यक्ती त्या घटनेपासून पळ काढू लागते. तेच सुजयच्या बाबतीत घडत होतं.
मेंदूत एखादी भयकारी घटना, प्रसंग नोंदवून ठेवली जाते. त्याची अतार्किक कारणमीमांसा नोंदवून ठेवली जाते आणि तसा प्रसंग आला, की अस्वस्थतेची लक्षणं सुरू. मूलत: हे मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे होतं. बऱ्याचदा अनुवांशिकता, दुबळी आत्मप्रतिमा अशाही गोष्टी लक्षणं वाढायला कारणीभूत ठरतात. सुजयला विमान प्रवासाचा जसा फोबिया तसा अनेकांना इतर.
उदाहरणार्थ, बंद जागांची भीती, लिफ्टची भीती, जंतूसंसर्गाची, मृत्यूची, कर्करोगाची, रक्ताची, अनोळखी ठिकाणांची, माणसांची. ही यादी प्रचंड मोठी आहे; पण यावर मात नक्की करता येते आणि ती करायला शिकायला हवं. जरूर भासल्यास वेळेवर तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी.
सुजय बंगळूरला असला, तरी या केसमध्ये माझ्याकडून अपेक्षित मदत मी नक्कीच करीन असं आश्वासन त्याला दिलं; पण त्यानं काय करायला हवं होतं? प्रथम या फोबियावर मी मात करू शकेन, हा विश्वास बाळगायला हवा. रिलॅक्सेशनची वेगवेगळी तंत्रं शिकून घ्यायला हवीत, त्यांचा रियाझ करायला हवा आणि ती प्रसंगाला तोंड देताना वापरायला हवी, नियमित चल पद्धतीचा व्यायाम करायला हवा, ज्यानं नैसर्गिकरीत्या सिरोटोनीन व इतर चांगली संप्रेरकं स्रवतील.
सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा. भीती वाटणाऱ्या प्रसंगाला आपण व्यवस्थित तोंड देत आहोत ह्या कल्पनाचित्राचा सतत मानसिक रियाझ करायला हवा. हळूहळू, पायरीपायरीनं, निर्धारानं आणि ठामपणे प्रसंगाला तोंड देण्याची सवय करावी आणि आवश्यक तिथं निःसंकोचपणे तज्ज्ञांची मदत घ्यावी.
सुजय आता बराच स्वस्थ झाला होता. म्हणाला, ‘पोचल्यावर तुम्ही म्हणाल ते सगळं करीन.’ मी स्मित केलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. थोड्याच वेळात तो गाढ झोपला. एखाद्या लहान, निर्व्याज बाळासारखा.
मी खिडकीतून बाहेर पाहिलं. अजून बाहेर अंधार होता. विमानाचं सावकाश हालणं आणि अजस्त्र पंख्यांखालच्या इंजिनचा घरघर आवाज. बाकी सगळी शांतता.... पण थोड्याच वेळात निश्चितपणे उजाडणार होतं.
सुजयनं भारतात पोचल्यावर सांगितलेलं सगळं केलं. बंगळूरला तज्ज्ञांकडून आवश्यक औषधं घेतली. सीबीटी, आरईबीटी, सिस्टिमॅटिक डिसेन्सिटायझेशन टेक्निक्स आणि आवश्यक त्या सायकोथेरपीज घेतल्या. रिलॅक्सेशनची तंत्रं शिकून घेतली. वेळ आल्यानंतर प्रसंगाला तोंड कसं द्यायचं, काय विचार करायचा हे सगळं शिकून घेतलं.
मध्ये काही महिने गेले. परवा सुजयचा बंगळूरहून फोन. ‘सर, सुजय खासनीस बोलतोय. आता सगळं मस्त चाललंय. गेल्या चार महिन्यात पाच ट्रिपा मारल्या.. नो प्रोब्लेम!’ मी त्याचं अभिनंदन केलं.
Article published in www.esakal.com | 13 Apr. 2024