Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


स्पर्धेचं युग आणि आपल्या क्षमता

 

सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे आणि चंगळवादाचंही आहे. टेक्निकल प्रगतीबरोबर येणारे सारे मोह इथे आहेत. या काळात यशस्वी व्हायचं आहे आणि मोहमयी वातावरणात विवेकानं मनावर ताबाही ठेवायचा आहे. अशा या स्पर्धेच्या युगात म्हणूनच ताणतणाव अपरिहार्य आहेत.

त्यांना तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. आसपास निर्माण होत राहणाऱ्या मोहाच्या गोष्टी, चंगळवादी गोष्टी खरंच आपल्याला सुख देऊ शकतात का, याचं analysis करता यायला हवं. चकाकते ते सगळे सोने नसते हे जाणवायला हवं.

आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपला व्यक्तिमत्त्वविकास असा व्हायला हवा, की त्यात कुठल्याही तणावाच्या परिस्थितीत मन शांत, स्थिर, कणखर आणि आनंदी असायला हवं. मनाची अशी जडणघडण बनवणं आता शक्य आहे. म्हणजेच मनाचं positive programming बऱ्याच अंशी शक्य आहे.

त्यासाठी आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात ‘व्यक्तिमत्त्वविकास’ या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थानं पाहायला हवं. व्यक्तिमत्त्वविकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे.

या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच; परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनशील बनणं त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर आणि विवेकी व्यक्तिमत्वत्त्व बनणं हे जास्त महत्वाचं. आयुष्यातील चढ-उतार, यश-अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्त्वाचं. असं व्यक्तिमत्त्व विशिष्ट प्रयत्नांनी मिळवता येतं.

मनाच्या व्यायामशाळेसाठी (Brain Gym) निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्त्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रं, व्यायाम शिकवणारी (Outer Journey), तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी (Inner Journey). म्हणजेच आतलं विश्व शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं, की खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्वविकास झाला असं म्हणता येईल.

या सगळ्याची सुरुवात करावी लागते ती व्यक्तिमत्त्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. काल्पनिक भीती, स्वत:विषयीच्या चुकीच्या, नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्यसनं, व्हिडिओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टीव्हीवर दिसणाऱ्या गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव या आणि अशा गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो.

तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. त्याचबरोबर आधीपासून आपल्यात असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्त्वविकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.

स्पर्धात्मक जगात टिकाव धरायचा असेल आणि यशस्वी व्हायचं असेल, तर outer journey आणि Inner journey या दोन्ही दिशांच्या प्रवासासाठी प्रयत्न करावे लागतील.

 

Article published in www.esakal.com | 29 Jun. 2024