Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


न्यूनगंड आणि सोशल फोबिया

 

मित्राच्या आग्रहावरून त्याच्या कंपनीत कार्यक्रमासाठी गेलो होतो. कंपनी नामांकित. प्रेझेंटेशन्स सुरू होती. एका मुलाचे सादरीकरण सुरू झाले. जेमतेम काही सेकंद झाले असतील, त्या मुलाला बोलता येईना, दरदरून घाम फुटला होता. चक्कर येऊन पडतो की काय, इतपत स्थिती झाली. त्यानं सादरीकरण थांबवलं. आत गेला. मित्र म्हणाला, ‘हा समीर आयआयटी पासआऊट. लवकरच गुड बाय करावा लागेल याला. नुसता मेरीटवाला असून उपयोग काय?

आत्मविश्वास शून्य. इथंच नाही तर रोजच्या वागण्यातसुद्धा दबलेला. मीटिंग असो, असाइनमेंट असो. performance low.’ मी म्हटलं, ‘मला भेटायचं आहे याला. मी मदत करू शकेन. एकदम काढू नका. याचे प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात.’ मित्राच्या डोळ्यात अविश्वास. मी हसलो, म्हणालो, ‘‘भेटायला सांग मला. त्याला असं का होतोय बघायला नको? त्याच्या करिअरचा प्रश्न आहे.’

समीर येऊन भेटला. त्याच्याशी बोलताना जाणवलं, याला लहानपणापासून न्यूनगंड व सोशल फोबिया आहे. इतका हुशार मुलगा; पण चारचौघांत वावरताना, लोकांशी बोलताना दडपण येतं. स्वत:वरचा ताबा जातो. छातीत धडधडतं, खूप घाम येतो. ‘सर, असं वाटतं आपल्यात इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे. काय ते कळत नाही; पण कॉलेजमध्ये असल्यापासून असं घडत गेलंय.

मनात इच्छा असूनदेखील खूप गोष्टी नाही करता आल्या. लोक आपल्याला हसतील, आपली चेष्टा करतील, असं वाटत राहायचं. कुठंही कार्यक्रमाला गेलो, तर अनोळखी लोक असोत नाहीतर ओळखीचे, एक प्रकारचं दडपण यायचं. आपण यांच्यात मिसळू शकत नाही असं वाटायचं. कुणाचं तरी आपल्याकडे लक्ष जाईल. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, असं वाटायचं. शिक्षण पूर्ण झालं.

नोकरीसाठी मुलाखती सुरू झाल्या. तिथंही तेच. प्रश्नांची उत्तर माहिती असायची; पण आयत्यावेळी घाम फुटायचा, काही आठवायचंच नाही. आत्ताही असं वाटतंय, की मिळालेली ही नोकरीसुद्धा हातची जाईल. आपल्या हातून काहीतरी चूक घडेल आणि घरी जावं लागेल.’

तो रडू लागला. मी त्याला मोकळं होऊ दिलं. धीर दिला. तसा तो हळूहळू शांत झाला. म्हणालो, ‘समीर, तुझ्यात काहीही कमी नाहीय. परिस्थिती नक्की बदलेल ह्यावर विश्वास ठेव. मी तुला मदत करीन. हा तुझा प्रश्न विशिष्ट प्रयत्नांनी सुटण्यासारखा आहे. आपण दोघं मिळून यावर काम करू.’’ त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास दिसत होता; पण डोळ्यांत आशेची चमकसुद्धा. कारण त्याला यातून बाहेर पडायचं होतं. आमची काही सेशन्स झाली.

त्याची आत्मप्रतिमा खूप दुबळी होती. त्याच्या रंगाविषयी, उंचीविषयी त्याला गंड होता. शाळेत, महाविद्यालयात, मुलांच्या चिडवण्यामधून तो आणखी पक्का झाला होता. लहानपणच्या दुबळ्या आर्थिक परिस्थितीमुळे, लोकांच्या टोमण्यांमुळेही तो दुखावला गेला होता. आपल्याला बोलण्याची कला अवगत नाही. चार लोकांत बोललो तर आपलं हसंच होईल हा समज घट्ट झाला होता. असे आणखी बरेच गंड त्याच्या मनात रुतून बसले होते. मी त्याला काही स्वस्थतेची सेशन्स दिली. काही मनाचे व्यायाम शिकवले आणि काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्या अशा :

  • जगात प्रत्येक व्यक्ती महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. तसाच तूही आहेस. प्रतिकूल परिस्थितीतून शिकून तू नोकरी मिळवली आहेस. तुझी बुद्धिमत्ता आणि कष्टाळू वृत्ती ही तुझी बलस्थानं आहेत. तुझी सगळी बलस्थानं शोधून काढ.

  • जगात प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे, वेगळी आहे. आपण सर्वं निसर्गनिर्मित आहोत. मग ती निर्मिती असुंदर कशी असू शकेल? रंग, उंची वगैरे परिमाणं मानवनिर्मित आहेत. त्यांच्याकडे फार लक्ष देण्यासारखं काही नाही. दिसण्यापेक्षा तुझं असणं म्हणजेच तुझी देहबोली, तुझं वागणं, तुझा वावर, आत्मविश्वास, बोलताना वापरली जाणारी सुसंस्कृत भाषा, चेहऱ्यावरचं स्मित जास्त महत्त्वाचं आहे.

  • आपण जसे आहोत तसेच्या तसे स्वत:ला स्वीकारणं महत्त्वाचं आहे.

  • आत्मविश्वास, संभाषणकौशल्य, निर्णयक्षमता, कुठल्याही प्रसंगात शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता इत्यादी व्यक्तिमत्त्वविकासाच्या गोष्टी विकसित करता येतात यावर विश्वास ठेव. त्यासाठी स्वत:त बदल घडणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

  • ‘माणसं आहेत तिथे मतभेद, संघर्ष, इर्षा, स्पर्धा, थोडंफार राजकारण असणारच. त्यानं मी अस्वस्थ होणार नाही. त्यासाठी कामाच्या ठिकाणी करायची स्वस्थतेची तंत्रे, स्वयंसूचना शिकून घेता येतात.’

  • ‘माझ्यासमोर असणारी लोकांची संख्या, त्यांची अधिकारपदामुळे असणारी श्रेणी या गोष्टीचं दडपण माझ्यावर यायचं काहीच कारण नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ व महत्त्वाचा असतो. मीही माझ्या ठिकाणी महत्त्वाचा आहेच. माझ्या अंगी नम्रता असावी; पण नेभळटपणा किंवा पळून जाण्याची वृत्ती नसावी.’ हे सगळं साधण्यासाठी, गर्दीची भीती घालवण्यासाठी कल्पनाशक्ती वापरून करायच्या guided imagery च्या तंत्रांचा सरावही उपयुक्त आहे.

 

Article published in www.esakal.com | 24 Feb. 2024