Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


नाकारले जाण्याची भावना

 

हेमंत खासनीस, वय तीसच्या आसपास. गेली दहा वर्षं काहीच करत नाही. घरी बसून असतो. कोणात मिसळत नाही. मित्र एकही नाही. कंटाळा आला, तर बाहेर चक्कर मारून परत येतो.

हेमंत खासनीस, वय तीसच्या आसपास. गेली दहा वर्षं काहीच करत नाही. घरी बसून असतो. कोणात मिसळत नाही. मित्र एकही नाही. कंटाळा आला, तर बाहेर चक्कर मारून परत येतो. कधी गाणी ऐकतो. हवं तेव्हा उठतो. हवं तेव्हा झोपतो. दुपारीसुद्धा चार-चार तास पडून असतो. समोर येईल ते खातो. आहेत तेच मोजके कपडे वापरत राहतो. शिक्षण अपूर्ण राहिलं. घरच्यांनी नोकरी लावण्याचा प्रयत्न केला.

काही कोर्सेसना घातलं; पण हा कशातच रस घेत नाही. मला काहीच जमणार नाही म्हणतो. सगळ्यांनी समजावून सांगून झालं. याच्यावर काहीच परिणाम नाही. हक्काच्या गोष्टी नीट कळतात. त्यामुळे पोकळ धमक्यांना घाबरत नाही. कुठलंही व्यसन नाही. लग्नसमारंभ, नातेवाईकांना भेटणं टाळतो. तज्ज्ञ म्हणतात, ‘यांच्यात आत्मविश्वासच नाही. सेल्फ इमेज, आत्मप्रतिमा दुबळी आहे. असुरक्षिततेची भावना घर करून बसलीय.’

सुळ्यांचा आशिष लहानपणापासूनच स्वभावानं तसा शांत, अबोल, साधासुधा होता. मार्क्स यथातथाच असायचे; पण वागण्यात वेगळं असं काही जाणवत नव्हतं. मात्र, तो तेरा-चौदा वर्षांचा झाला, तसा त्याचा अलिप्तपणा जास्त जाणवायला लागला. सोसायटीमध्ये, मुलांमध्ये फारसा मिसळायचा नाही. किंबहुना कुठल्याही ग्रुपपासून लांब लांबच राहायचा. घरच्या समारंभात जायलाही टाळायचा.

विशेष करून हे जाणवायला लागलं, तेरा-चौदा वर्षांचा असल्यापासून. सुरवातीला असेल स्वभाव एकलकोंडा, अलिप्त राहण्याचा असं म्हणून सुळे दाम्पत्यानं सोडून दिलं. वयात येतानाची लक्षणं म्हणूनही दुर्लक्ष केलं; पण पुढे प्रमाण वाढत गेलं. वरून शांत, स्वस्थ वाटणारा आशिष सगळ्या आघाड्यांवर मागे राहायला लागला. कसाबसा पदवीधारक झाला; पण पुढे शिकणं शक्य झालं नाही. त्याला नोकरीला चिकटवायचे असंख्य प्रयत्न झाले.

एखाद दोन दिवस जायचा. पुन्हा घरी राहायचा. कुठलंही व्यसन नव्हतं. वयाप्रमाणे वाटणारं कपड्यांचं, वस्तूंचं आकर्षण नव्हतं. मित्र नव्हते. मैत्रिणी ही गोष्ट लांबच राहिली. लोकांमध्ये मिसळणं त्याला आवडत नव्हतं, जमत नव्हतं. घरच्यांनी ओरडून पाहिलं. नातेवाइकांनी समजावून झालं; पण तो कुठल्याच अर्थानं क्रियाशील नव्हता. सर्वांनी त्याला आळशी, पुरुषार्थहीन वगैरे विशेषणं लावून टाकली होती. मात्र, कुणालाही त्याला काही प्रॉब्लेम असेल असं वाटलं नाही.

एक दिवस कोणाच्या तरी सांगण्यावरून सुळे त्याला घेऊन आले. त्याला बरेच प्रॉब्लेम्स होते. पुढे Psychometric tests मधून ते सगळं पुढं आलंच. त्याला इतर प्रॉब्लेम्सबरोबर Avoidant Perosnality Disorder होती.

या डिसॉर्डरमध्ये कमालीचा लाजाळूपणा, असुरक्षिततेची भावना आणि आपल्याला नाकारलं जाईल अशी सतत भीती असते. या व्यक्ती स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखतात आणि त्यांचा त्यांना कमालीचा त्रास होत असतो.

ही disorder साधारणपणे पौगंडावस्थेत सुरू होते आणि इतरही disorders ची co-morbidity असू शकते. प्रामुख्यानं depressive disorders, अस्वस्थतेचे आजार, न्यूनगंड, सोशल फोबिया, Dependent Personality disorder, schizoid personality disorder वगैरे. या डिसॉर्डरमधील लक्षणं आणि उपचार यांविषयी पुढील भागात माहिती घेऊ.

(क्रमशः)

 

Article published in www.esakal.com | 31 Aug. 2024