Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


कृतिशीलतेचा अभाव

 

गेल्या आठवड्यात Avoidant Personality Disorder असलेले हेमंत आणि आशिष यांची उदाहरणं बघितली.

(Read previous article - नाकारले जाण्याची भावना)

आता या डिसॉर्डरबाबतची लक्षणं आणि उपचार बघूया. या डिसॉर्डरमध्ये पुढीलपैकी लक्षणं आढळतात.

  • आपल्याला नाकारलं जाईल, टीका होईल या भीतीनं नोकरी- व्यवसाय करणं टाळलं जातं.

  • विशिष्ट आवडत्या परिचित व्यक्ती सोडून इतरांशी संबंध टाळला जातो.

  • टिंगल होईल, नाकारलं जाईल या भीतीनं नवीन नातं जोडणं, प्रेम व्यक्त करणं या गोष्टी टाळल्या जातात. सार्वजनिक समारंभ टाळले जातात.

  • इतरांपेक्षा सर्वार्थानं कमी असल्याची भावना मनात रुजलेली असते. कुठलीही जोखीम घेण्याची तयारीच नसते.

  • अत्यंत दुर्बल आत्मप्रतिमा. आत्मविश्वासाचा अभाव आढळतो.

ही डिसॉर्डर असणाऱ्या व्यक्तींमध्ये साधारणपणे पुढील personality traits आणि विचार करण्याची चुकीची धाटणी आढळते. या गोष्टी इतर Perosanality disorders असलेल्या व्यक्तींमध्येही आढळू शकतात.

  • नाकारले जाऊ, टीका होईल, कमतरता उघड होईल या भीतीपायी वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध टाळले जातात किंवा तोडलेही जातात.

  • प्रॉब्लेम आला, तर त्यामधून मार्ग कसा काढायचा, या विचारापेक्षासुद्धा प्रॉब्लेम कुणामुळे निर्माण झाला त्याला दोष देत राहायचं हेच चालू असतं.

  • ‘मी कायम अपयशीच असणार, कधीच यशस्वी होणार नाही’, ही वाक्यं रुंजी घालत असतात. ‘कायम’ आणि ‘कधीच’ हे दोन शब्द या संदर्भात विचारप्रक्रियेत असतातच.

  • आपल्या बाबतीत वाईट तेच घडणार त्यामुळे शक्यतो कृती करणं पुढे ढकलायचं. काहीही निष्पन्न न होणारे endless वाद घालत राहायचे.

  • या व्यक्ती कुणावर तरी भावनिकदृष्ट्या अति अवलंबून असतात. तसंच सोप्या, साध्या निर्णयांसाठीही अवलंबून असतात.

  • बऱ्याचदा नैराश्याच्या आजाराची शिकार असतात. मदत, सहानुभूती मिळावी म्हणून इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असू शकते.

  • स्वत:च्या मनोराज्यात (fantasy), दिवास्वप्नात रमण्याची सवय असते- ज्यात यांना सुरक्षित वाटेल. आपल्या प्रयत्न न करण्याबद्दल दुसरी व्यक्ती जबाबदार आहे, हा ठाम ग्रह करून घेतलेला असतो.

  • FOG (Fear Obligation Guilt) कुठल्यातरी गोष्टीचं सतत दडपण, भीती, गंड, अपराध गंड मनात असतो.

  • आपण कुणीच नाही आहोत ही भावना सतत मनात असते. कुणावरही विश्वास ठेवायला तयार नसतात.

  • कुठल्याही कृतीमध्ये आत्मविश्वासाची भावनाच नसते.

उपचार

कुठलीही Personality Disorder ही treat करायला तशी अवघडच असते, कारण अतिशय खोलवर रुजलेल्या चुकीच्या कल्पना, विचार, भावना आणि पक्क्या झालेल्या चुकीच्या वर्तनाच्या पद्धती. AVPD मध्ये अडकलेल्या व्यक्तींना आतून विलक्षण त्रास होत असतो; तसंच नाती जोडण्याची इच्छाही असते. त्यामुळे ताणतणाव वा नैराश्यासाठीच्या औषधांबरोबरच सुयोग्य मानसोपचार पद्धती उपयोगी पडतात.

कुठली पद्धत उपयोगी पडेल हे त्या त्या व्यक्तीची बौद्धिक, भावनिक व वैचारिक जडणघडण लक्षात घेऊन तज्ज्ञ ठरवतात. ग्रुप थेरपीही काही प्रमाणात उपयोगी ठरू शकते. या डिसॉर्डरबरोबरच इतर आजार असतील, तर त्यावरही उपचार घेणं जरूर असतं. वर्तनात वरील लक्षणं आढळली, तर ताबडतोब तज्ज्ञांची मदत घेणं चांगलं. कारण जसजसा जास्त काळ जाईल, तसतशी केस chronic होत जाते. साधारणपणे पौगंडावस्थेत याची सुरवात जास्त वेळा होते. त्याकाळात मुलामुलींकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं.

 

Article published in www.esakal.com | 7 Sept. 2024