रात्री बाराचा सुमार असावा. मस्त थंडी होती. लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर सर्व सोपस्कार उरकून फ्लाइटची वेळ होईपर्यंत, ५ नंबरच्या टर्मिनसवर मी एका ठिकाणी कॉफी घेत बसलो होतो.
रात्री बाराचा सुमार असावा. मस्त थंडी होती. लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर सर्व सोपस्कार उरकून फ्लाइटची वेळ होईपर्यंत, ५ नंबरच्या टर्मिनसवर मी एका ठिकाणी कॉफी घेत बसलो होतो. एक २८, २९ वर्षांचा भारतीय तरुण माझ्या टेबलपाशी आला. ‘इथे बसू का?’ असं त्यानं इंग्रजीत विचारलं. मी हसून ‘my pleasure’ म्हणालो. त्यानं कॉफीचा मग आणला होता. खूप अपसेट वाटत होता. एवढ्या थंडीत चक्क घाम फुटला होता त्याला. हात थरथरत होते. कॉफीचा मग कसाबसा ओठांपर्यंत जात होता. डिस्टर्ब वाटत होता खूप. अचानक त्यानं विचारलं, ‘इंडियन?’
मी म्हटलं, ‘येस. महाराष्ट्रीयन.’ त्यानं एकदम रिलीफ मिळाल्यासारखा निश्वास टाकला. मराठीत म्हणाला, ‘मी सुजय... सुजय खासनीस. आयटी कंपनीत आहे. पंधरा दिवसांसाठी इथं आलो होतो.’ मी हात मिळवला आणि माझं नाव सांगितलं. फ्लाइटविषयी विचारलं. गमतीचा भाग म्हणजे आमची फ्लाइट एकच होती आणि सीट्सही शेजारी होत्या. मी म्हणालो, ‘What a pleasant surprise! चला, म्हणजे आता मला छान कंपनी मिळाली.’
तो कसनुसा हसला. जसजसा वेळ जात होता तसतसा तो जास्त जास्त अस्वस्थ होताना दिसत होता. शेवटी मी त्याला त्याविषयी विचारलं. ‘काही मदत हवी आहे का?,’ असं विचारलं. तो म्हणाला, ‘कसं सांगू सर, प्रत्येक वेळी असं होतं. विमानानं जायचं म्हटलं, की पोटात गोळा उठतो. मला फ्लाइट आणि हाइटची भीती वाटते. छातीत धडधडायला होतं, हात-पाय कापतात; पण आता ही शेवटची वेळ.
मी नोकरी सोडणार आहे. गावी जाऊन दुसरं काही तरी करणार आहे; पण हेही सोपं नाही. नुकतंच माझं लग्न झालंय. हेमांगीला, माझ्या बायकोला कितीही समजावलं, तरी माझा प्रॉब्लेम लक्षात येत नाही.’ मी विचारलं, ‘काय शिकलायस तू?’ तो म्हणाला, ‘एम.टेक. आयआयटी पवई.’ एका हुशार तरुणाचं संभाव्य दिमाखदार कर्तृत्व काळोखून जाण्याचा संभव होता.
आमच्या फ्लाइट बसची announcement समोर इंडिकेटरवर दिसत होती. मी त्याच्या खांद्यावर हात टाकला, म्हटलं, ‘चल, मी आहे तुझ्याबरोबर. काही होणार नाही तुला.’
आम्ही बाहेर पडलो. बाहेर थंडी ‘मी’ म्हणत होती. जोडीला बोचरं वारं. मागे पाहिलं, तर हिथ्रोचं अवाढव्य स्वरूप आणि इकडे तिकडे वेगवेगळ्या रंगांचे लुकलुकणारे दिवे. बसमधून विमानापर्यंतचं अंतर पाच-दहा मिनिटांचं होतं. तेवढा वेळसुद्धा त्याला नीट उभं राहता येत नव्हतं. माझ्या लक्षात आलं, ही फोबिक anxiety होती. या मुलाला यातून बाहेर काढायलाच हवं होतं. विमानात सीट्सवर बसेपर्यंत मी त्याचा हात सोडला नाही.
त्यानंतरही तो सतत पाणी पीत होता. त्याला धाप लागत होती. मी हसून त्याला माझी, मी काय करतो याची माहिती दिली. त्याला सांगितलं, ‘तू प्रॉब्लेममधून बाहेर पडू शकतोस. मी तुला मदत करीन. भारतात पोचल्यावर, बंगलोरला, म्हणजे जिथे तू सध्या आहेस, तिथले तज्ज्ञ तुला मदत करतील. माझ्याशी आता फक्त मोकळेपणानं बोल.
‘सर, मला नक्की काही होणार नाही ना? म्हणजे हार्ट ॲटॅक वगैरे?’ मी म्हणालो, ‘नक्की काही होणार नाही. हे तुला होतंय ते सारं मेंदूतील रासायनिक बदलांमुळे होतंय. आता फक्त तू मोकळेपणानं बोल.’
(क्रमशः)
Article published in www.esakal.com | 6 Apr. 2024