Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


हे आयुष्य सुंदर आहे!

 

‘सर, जगातला सगळ्यात अपयशी माणूस आहे मी. जगून तरी काय करू? काहीही जमणार नाही मला. मग तो अभ्यास असो, प्रेम असो नाहीतर नोकरी.

  • २३ मे : सत्तावीस मे जवळ आलाय. रिझल्ट लागेल त्या दिवशी. पुन्हा backlog असणार. सगळे हसणार. नेहासुद्धा. campus interview ला सिलेक्शन वगैरे लांबच राहिलं. डोक्याचा पार भुगा झालाय. आत्मविश्वास या शब्दाचीसुद्धा भीती वाटते. सगळीकडे पराभव.

  • २४ मे : आज सकाळपासून असह्य झालंय सारं. ठरवून टाकलं, संपवून टाकायचं सगळं. डेथ नोट लिहून टाकायची, माझ्या मृत्यूला कुणाला जबाबदार धरू नये. आयुष्यात हरल्यामुळे मी स्वतःच्या जबाबदारीवर हा निर्णय घेत आहे.

अजयची डायरी समोर होती आणि समोर खचलेला, हताश अजय.

‘सर, जगातला सगळ्यात अपयशी माणूस आहे मी. जगून तरी काय करू? काहीही जमणार नाही मला. मग तो अभ्यास असो, प्रेम असो नाहीतर नोकरी. मी जन्माला तरी का आलो असं वाटतं कधी कधी...’ मी त्याला जवळ घेतलं. म्हटलं, ‘हे बघ, तुला किती त्रास होत असेल मी समजू शकतो; पण काही सत्य तुला सांगतो. मृत्यू सगळ्यांनाच अटळ आहे रे; पण आपण त्या आधीच्या सुंदर जगण्याचा विचार करूया की!

तू स्वतःभोवती नकारात्मक विचारांचं असं एक जाळं विणून घेतलंयस. आपण कमी आहोत हा ठाम ग्रह करून घेतला आहेस. मी अपयशीच होणार ही तुझी स्थायी भावना बनून गेलीय. या भावनेतूनच तू प्रसंगांना सामोरं जातोस आणि लहानसं अपयश आलं, की आणखी खचत जातोस. अपयशाची खरी कारणं तू लक्षातच घेत नाहीयेस.

वस्तुस्थिती अशी आहे, की जगात कुणीही स्वतःला कमी मानण्याची गरज नाही. प्रत्येकाकडे काही ना काही तरी वैशिष्ट्य आहेच. ते ओळखायचं, आपल्या बलस्थानांचा विचार करायचा आणि आनंदानं पुढे जायचं. एक सांगू, आपण सगळे जगतो फक्त दोन शब्दांसाठी ‘आनंद’ आणि ‘मन:शांती’ आणि ती मिळवणं आपल्याच हातात आहे. त्याच्यासाठी साधना आहे, रियाझ आहे. भूतकाळाचं ओझं न बाळगता, वर्तमान क्षणात कसं जगायचं हे सगळं शिकणं आहे. प्रत्येकवेळी, मी जिंकलोच पाहिजे हा अट्टाहास नसावा. प्रवासाचा, प्रोसेसचा  आनंद खरा आनंद!

‘तुझा त्रास मी समजू शकतो; पण आयुष्याचा शेवट करण्याचा विचार करणं किंवा व्यसनांच्या आहारी जाणं हा मार्ग असू शकत नाही. त्यापेक्षा समस्येच्या मुळापर्यंत जाणं आणि तिचं निराकरण करणं शक्य आहे. तुझी समस्या एकाग्रतेची आहेच, त्याचबरोबर एकूणच आयुष्यात नेमकं काय मिळाल्यास आपण सुखी होऊ याच्या उत्तराची आहे, दृष्टिकोन बदलाची आहे. यश, तू  यातून निश्चित बाहेर येशील.

भले या वर्षी तुला मार्क्स कमी पडतील, विषय राहतील किंवा अगदी नापास होशील; पण हळूहळू पायरीपायरीनं एकाग्रता व्हायला लागेल. एकाग्रता कशामुळे गेलीय, ती कशी मिळवायची, आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, हे सगळं तुझ्या लक्षात येईल. अंतिमत: तुझं ध्येय तू गाठशील. आयुष्यात आनंदी होशील आणि इतरांना आनंद देत राहशील; पण उद्यापासून काही गोष्टी करायच्या.’

यशचे डोळे चमकले. त्याला सांगितलं, ‘उद्यापासून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. भावनांवर ताबा कसा मिळवायचा, परिस्थितीशी जुळवून कसं घ्यायचं, तणावाचा उगम/स्रोत कसा शोधायचा, सकारात्मक दृष्टिकोनाची जोपासना कशी करायची,  आयुष्यातील  प्राथमिकता  कशी ठरवायची/बदलायची इत्यादी.’’

यश म्हणाला, ‘हे सगळं मला जमेल?’ म्हटलं, ‘का नाही? अनेकांना हे जमलंय. तणावनियोजनाच्या विविध पद्धती (Eastern व Western) आपण शिकूया. प्रत्येक क्षणात, वर्तमानात, स्वस्थ कसं रहावं; तटस्थपणे  स्वतःकडे, परिस्थितीकडे  कसं पाहावं हे  शिकूया. काही  ध्यानाच्या  पद्धती  शिकूया, ज्यायोगे  चित्त  शांत  होईल. याबरोबरच रोज भरपूर व्यायाम करूया ज्याने चांगली संप्रेरकं शरीरात स्रवतील, औदासीन्य कमी व्हायला मदत मिळेल.’

यश प्रथमच हसला. म्हणाला, ‘सर, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. उद्या भेटूया आपण. सुरू करू.’ ‘आणि बियर?’ मी विचारलं. ‘आजपासून संपलं सगळं सर. सगळं ठीक होणार असेल तर कशाला हवीय ती?’

मी स्वस्थ झालो होतो, एक आयुष्य मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. परीक्षेच्या अतिरिक्त ताणामुळे, अपरिपक्व विचारसरणीमुळे, नैराश्यामुळे, फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्त्वं कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतल्यास आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य मिळायला मदत करू शकतो.

(क्रमशः)

 

Article published in www.esakal.com | 23 Mar. 2024