Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


सकारात्मक विचारसरणीसाठी...

 

सकारात्मक विचारसरणीबाबत काही गोष्टी आपण गेल्या आठवड्यात बघितल्या. सकारात्मक विचारसरणी अमलात येण्यासाठी या गोष्टी लक्षात केल्या तर मनाला तसं वळण लागायला मदत होईल.

  • आपल्याकडील क्षमता ओळखूया, लक्षात घेऊया. स्वत:वर, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवूया.

  • आपल्या मन:शांतीचं सुकाणू आपल्याकडे ठेवूया. म्हणजेच इतर माझ्याविषयी काय म्हणतात, यावर माझी मन:शांती अवलंबून असता कामा नये. माझा आतला गाभा नेहमीच स्वस्थ, शांत असला पाहिजे.

  • स्वत:विषयी व इतरांविषयीही सतत चांगला विचार करूया, चांगलं बोलूया. इतरांच्या चांगल्या कृतीबद्दल, यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करूया.

  • प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवलेल्यांचा आदर्श समोर ठेवूया. त्यानं प्रोत्साहन मिळेल आणि सकारात्मक दृष्टिकोन रुजायला मदत होईल.

  • नकारात्मक संवाद, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांपेक्षा सकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांबरोबर राहूया.

  • स्वत:शी आपला, आपण जागं असताना सतत स्व-संवाद होत असतो. तो सकारात्मक होतोय याकडे जाणीवपूर्वक पाहूया. नकारात्मक विचार मनात आल्यास ताबडतोब जाणीवपूर्वक सकारात्मक विचार मनात आणूया.

  • Helplessness is not hopelessness. असहाय वाटलंच, तरी त्याचा अर्थ सगळं संपलं असं नव्हे. There is always light at the end of tunnel. म्हणूनच विपरित परिस्थिती आलीच, तर ती बदलेलच यावर ठाम विश्वास ठेवूया.

  • नकारात्मक विचारसरणीचे असल्यास स्वत:त बदल घडवणं अत्यावश्यक असल्याचं आणि असा बदल घडवता येतो हे मान्य करूया.

  • भूतकाळातल्या कडवट आठवणी, अनुभव विसरूया आणि पुढे जाऊया. स्वत:वर टीका करणं थांबवूया आणि आव्हानांना सामोरं जायचं ठरवूया.

  • कळत- नकळत होणारं नकारात्मक बोलणं थांबवूया. प्रत्येक गोष्ट व्यक्तिश: घ्यायला नको. साक्षीभावानं म्हणजे शांतपणे परिस्थिती न्याहाळण्याच्या कलेनं माणसं, प्रसंग, घटना अनुभवायचा प्रयत्न करूया.

मेंदूवर परिणाम

मेंदूमध्ये prefrontal cortex मध्ये न्युरॉन्सची ग्रोथ होते. नवीन synapses तयार होतात. याच भागामध्ये मन, विचार यासंबंधीचे महत्त्वाचे कार्य चालते. विश्लेषण करणं व विचार करण्याची क्षमता वाढते. नवनवीन, सर्जनात्मक विचार निर्माण होण्याची क्षमता वाढते. cortisol आणि andrenalin वर नियंत्रण; तसंच सिरोटोनिन व इतर happy हार्मोन्सचं सिक्रेशन.

(क्रमश:)

 

Article published in www.esakal.com | 21 Sept. 2024